पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा लवकरच सुरळीत करणार - बबनराव लोणीकर

गावांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधीची तरतूद करणार

मुंबई | अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली तसेच सातारा जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार असून पूरग्रस्त गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना विशेष निधीची तरतूद करणार असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली आहे.

पूरग्रस्त भागातील पाणी पुरवठा योजना व स्वच्छतेबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी लोणीकर बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अपर मुख्य सचिव शामलाल गोयल व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

लोणीकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा या भागातील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे 604 पाणी पुरवठा योजना, सांगलीमध्ये 130 पाणी पुरवठा योजना, साताऱ्यामध्ये 98 पाणी पुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने या भागातील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाय योजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी करावी. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरिनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्त्रोत दूषित आहेत, त्या जलस्त्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, असे निर्देशही लोणीकर यांनी यावेळी दिले.

तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत. जेणेकरून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करता येवू शकतील. या भागातील अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणीच्या बुजलेल्या आहेत. त्या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनामध्ये कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाय योजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करावा.

राज्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात येणार आहे. 1500 लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना 50 हजार तर 1500 च्या पुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना 75 हजार रुपये निधी प्राथमिक स्वरुपात त्वरीत वितरीत करण्यात येणार असल्याचे लोणीकर यांनी सांगितले.



AM News Developed by Kalavati Technologies