परभणी | जिल्हा शल्य चिकित्सकांना पदमुक्त करा, भाजपचे महानगराध्यक्ष आनंद भरोसेंची मागणी

गेल्या काही दिवसापासून परभणीत रूग्णसंख्या वाढत असतांना जिल्हा शल्यचिकित्सक मात्र याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत.

परभणी | कोरोना विरुध्दच्या लढाईत सर्व योद्धे अहोरात्र काम करीत आहेत मात्र परभणी येथील शासकीय रूग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे हे गलथान कारभार करीत असल्याने त्यांना तात्काळ पदमुक्त करावे अशी मागणी भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. परभणी जिल्हा शासकीय रूग्णालयात मोठ्या प्रमाणात असुविधा निर्माण झालेल्या आहेत. गेल्या काही दिवसापासून परभणीत रूग्णसंख्या वाढत असतांना जिल्हा शल्यचिकित्सक मात्र याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. याच संदर्भात भाजपाचे महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी या सर्वबाबीची माहिती घेतली असता शासकीय रूग्णालयातील विलगीकरण कक्षात असुविधा असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी स्वच्छतागृहाची दुरावस्था झालेली असून स्वच्छतेचेही तीनतेरा वाजले आहेत. रूग्णालयातील कर्मचार्‍यांनाही पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्या नसल्याने दोनच दिवसापुर्वी या कर्मचार्‍यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे यांना धारेवर धरले होते. विलगीकरण केलेल्या रूग्णांसाठी दिले जाणारे जेवणही निकृष्ट दर्जाचे आहे.

शासनाकडून आलेल्या निधीच्या अनुषंगानेच शासकीय रूग्णालयात कामे होत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर बनत असल्याने गलथान कारभार करणार्‍या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागरगोजे यांना पदमुक्त करावे अशी मागणी महानगराध्यक्ष आनंद भरोसे यांनी केली आहे. या संदर्भात भरोसे यांनी थेट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशीही दुरध्वनीवरून संपर्क साधुन त्यांनाही याबाबत माहिती दिली असता यावरन कारवाई करण्याचे आश्‍वासन दिल्याचे भरोसे यांनी सांगितले. यावेळी महानगर शाखेचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, मोहन कुलकर्णी, संजय शेळके, प्रशांत सांगळे, मोकींद खिल्लारे, सौ. मंगल मुदगलकर, मधुकर गव्हाणे, विजय दराडे यांच्यासह अन्य पदाधिकारी व महापालिका सदस्यांनी प्रशासनास निवेदन सादर केले.AM News Developed by Kalavati Technologies