धनोडीच्या शेतकऱ्याने अवघ्या 1300 रुपयात तयार केले डवरनी यंत्र

लॉकडाऊनच्या काळात मजुर आणि बैलजोडी मिळत नसल्याने लढवली शक्कल

अमरावती । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील धनोडी येथील गोविंद शेलोकार या तरुण शेतकऱ्याने डवरनी यंत्र तयार केले आहे. वेळेवर मजुर आणि बैल मिळत नसल्याने या शेतकऱ्यांने अनोखी शक्कल लढवली आहे. गोविंद शेलोकार असे या तरुण शेतकऱ्यांचे नाव आहे.
शेतीत कामे करून घेतांना बऱ्याच अडचणी येत असतात. प्रामुख्याने आता गावांमध्येही मजुरांची संख्या पुर्वी होती तेव्हढीच शिल्लक आहे. नवीन पिढी शेतीतील कामांसाठी फारशी येत नाही. याशिवाय महागाई सुध्दा चांगलीच वाढली आहे. मजुरांचा वाढता रोज, बैल जोडी तसेच डवरवी यंत्राचे भाडे यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक भार येतो.

अशातच लॉकडाऊनच्या काळात गोविंद शेलोकार यांनी शक्कल लढवित स्वत:च डवरनी यंत्र विकसित केले आहे. या यंत्राचे वजन ८ ते ९ किलो असुन याला बनविण्यास सुमारे १३०० ते १४०० रूपये खर्च लागला आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात २० ते २५ दिवस दररोज एक ते दोन तास काम करून हे यंत्र घरीच तयार केल्याचे गोविंद शेलोकार यांनी सांगितले. या यंत्राला दोन चाके असुन हातगाडीप्रमाणे या यंत्राला एका माणसाच्या सहाय्याने पुढे नेता येते व यशस्वी डवरनी होते. सदर यंत्र सोयाबीन व हरभरा या पिकामध्ये डवरनी करीता कामी येते. डवरनी करण्यास थोडा वेळ लागत असला तरी यामुळे मनुष्यबळ कमी झाले तसेच बैलांची सुध्दा आवश्यकता राहिलेली नाही. याशिवाय पैशांचीही बचत होणार आहे.AM News Developed by Kalavati Technologies