धनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात - सुधीर मुनगंटीवार

अल्पसंख्याक महिला बचतगट माविमशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्या - वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची सूचना

मुंबई ।  मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाने 10 हजाराहून अधिक अल्पसंख्याक महिलांचे स्वयंसहाय्यता गट स्थापन केले आहेत. त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळाशी जोडून अनुदान उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना आज वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते आज बोलत होते.

राज्यातील अल्पसंख्याक महिला व युवकांना विविध रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले की, तंत्रशिक्षण आणि रोजगार उपयोगी साहित्य देण्याकरिता 2019-20 या वर्षात 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांकरिता 460 प्रवेश क्षमतेची व 2 तुकड्यांचे 10 व्यवसाय अभ्यासक्रम असलेली नवीन औद्योगिक शिक्षण व प्रशिक्षण संस्था मालेगाव येथे सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मौलाना आझाद आर्थिक महामंडळाने अल्पसंख्याक महिलांचे बचतगट तयार केले आहेत, त्यांना हे महामंडळ कर्ज देऊ शकते परंतु अनुदान नाही. त्यामुळे हे बचतगट माविमशी संलग्न करण्यात यावेत व त्यांना त्यांच्या माध्यमातून विविध व्यवसायाचे प्रशिक्षण देऊन रोजगारासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात यावे, असे श्री.मुनगंटीवार यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या विकास योजना वेगाने मार्गी लावाव्यात

धनगर समाजासाठी अर्थसंकल्पात आदिवासी विभागाच्या तरतुदीशिवाय अतिरिक्त 1000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतून 22 योजना राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. या योजनांना निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही नियोजन विभागाने वेगाने राबवावी, त्यासाठी ज्या प्रशासकीय बाबींची पूर्तता करून घ्यावी लागेल त्याची पूर्तता करावी अशा सूचनाही मुनगंटीवार यांनी दिल्या.

बारा बलुतेदार सक्षमीकरणासाठी खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत कुटीर आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात येणार आहे. यासाठी खादी ग्रामोद्योग मंडळाला अनुदान स्वरूपात 100 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निधीतून महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी, खेड्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी योजनांची अंमलबजावणी होणार आहे, त्याबाबतही आज वित्तमंत्र्यांनी आढावा घेतला. या बैठकीस अल्पसंख्याक विकास विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे,मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे  यांच्यासह विभागाचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies