वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहास तात्काळ चांगल्या सुविधा देणार - धनंजय मुंडे

मुंडे यांनी वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

मुंबई | वरळी बीडीडी चाळ येथील मागासवर्गीय मुलामुलींच्या वसतिगृहाच्या विविध समस्या सोडविण्यासाठी वसतिगृहाला भेट दिली. त्या समस्या सोडविण्यासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री धनंजय मुडे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. वरळी बीडीडी चाळ येथील वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी वसतिगृहाला मिळणाऱ्या सुविधांबाबत आंदोलन केले होते. त्याची तात्काळ दखल घेऊन मुंडे यांनी वसतिगृहास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

श्री.मुंडे यावेळी म्हणाले, शासकीय मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये सुधारणा करण्याबाबत शासन निर्णयामध्येही बदल करण्याबाबत विभागामार्फत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. राज्यातील शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निवासाची, भोजनाची व इतर शैक्षणिक सुविधांबाबत लवकरच आढावा घेऊन निर्णय घेण्यात येईल.

वरळी वसतीगृह येथे 15 दिवसांत सोयीसुविधा देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. मुंबईमध्ये मुलामुलींच्या वसतिगृहासाठी नव्याने बांधकाम सुरु असून ते काम पूर्ण होईपर्यंत येथील वसतिगृहाला आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा देण्यात येतील, असेही श्री.मुंडे यांनी सांगितले. यावेळी सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार कपिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.



AM News Developed by Kalavati Technologies