जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करा - माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी बबनराव लोणीकर यांची मुख्यमंत्री व राज्यपाल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.

जालना । मागील अनेक दिवसांपासून जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात प्रचंड अतिवृष्टी असून, एकट्या जालना जिल्ह्यात सात लक्ष हेक्‍टरपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले आहे. बहुतांश शेती क्षेत्रात अद्याप पाणी असून, पंचनामे करण्यासाठी त्या क्षेत्रात जाता येत नाही अशी भयंकर परिस्थिती आहे. शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला असून, जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा व त्याचप्रमाणे नुकसान भरपाई देऊन, शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 50 हजार रुपयांची मदत करण्यात यावी, अशी मागणी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्राद्वारे केली आहे.

मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या, अतिवृष्टीमुळे शेती पूर्णपणे उध्वस्त झाला असून ऊस, कापूस, द्राक्ष, पपई, सोयाबीन, मूग, उडीद, मका या पिकांची पूर्णपणे नासाडी झालेली आहे. अद्याप देखील पावसाचा जोर संपलेला नसून, पुन्हा शेतकऱ्यांवर अवकाळी पावसाचे संकट कोणत्याही क्षणी येऊ शकतं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे हतबल झाला असून "हे शेतकऱ्यांचा सरकार आहे" असं म्हणत सत्तेवर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी. अशी अपेक्षा प्रत्येक शेतकऱ्याला आहे असेही लोणीकर यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.

जालना जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून सरसकट हेक्टरी 50 हजार रुपये मदत करावी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना तात्काळ सुरू करण्यात यावी, या वर्षीचा खरीप पिकांचा पिक विमा तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावा, अतिवृष्टीमुळे बांध-बंधारे फुटून झालेल्या शेतीच्या नुकसानीला वेगळे आर्थिक पॅकेज जाहीर करावे तसेच निम्न दुधना प्रकल्पातील अतिरिक्त बाधित क्षेत्र संपादित करून, त्यांना तात्काळ मावेजा देण्यात यावा अशा मागण्या लोणीकर यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना दिलेल्या पत्रात केल्या आहेत.AM News Developed by Kalavati Technologies