सुप्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

केंद्रीय माहीती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून ही माहीती दिली आहे

नवी दिल्ली । बॉलीवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना चित्रपट सृष्टीतील मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय माहीती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटरवरून ही माहीती दिली आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल बिग बींचे त्यांनी अभिनंदन केलं आहे. "ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून आपले मनोरंजन करत आहेत. आपल्या जवळजवळ दोन पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. त्यांची यंदाच्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देश तसेच देशाबाहेर असणारे अमिताभ यांचे चाहतेदेखील खूश होतील. त्यांना या पुरस्कारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा." असं जावडेकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.  अमिताभ बच्चन यांना सिनेसृष्टीतील योगदानाबाबत हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय सामाजिक आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही अमिताभ बच्चन यांचे अभिनंदन केले आहे. अमिताभ बच्चन यांनी सात हिंदुस्थानी या सिनेमापासून आपली कारकीर्द सुरु केली होती. त्यानंतर त्यांच्या रुपाने भारतीय सिनेसृष्टीला एक महानायक मिळाला. आता त्यांचा सन्मान सिनेक्षेत्रातील सर्वोच्च बहुमान समजल्या जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्काराने केला जाणार आहे. केंद्र सरकारने हा पुरस्कार त्यांना जाहीर केला आहे.AM News Developed by Kalavati Technologies