संचारबंदीतसुद्धा बळीराजावर रस्त्यावर येण्याची वेळ, बाजारपेठेत खताचा कृत्रिम तुटवडा

युरिया खतासाठी लागल्‍या लांबच-लांब रांगा

परभणी । वरुण राजा शेतकऱ्यावर मेहरबान झाला आणि चांगला पाऊस पडला. मात्र शेतकऱ्यांच्या नशिबी दारिद्री अवस्था प्रत्येक वर्षी असतेच. परभणी जिल्ह्यामध्ये सध्या संचारबंदी सुरू असताना शेतकऱ्यांना युरिया खतासाठी मोठी धडपड करावी लागत आहे. बाजारपेठेत खते उपलब्ध असतानाही, शेतकऱ्यांना खत मिळत नाही. यासाठी आपला जीव धोक्यात टाकून बाजारपेठेत रांगा लावून उभारण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. युरिया खताचा मोठा कृत्रिम तुटवडा येथील व्यापारी करीत असल्यामुळे शेतकऱ्यांना हा त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.
बाजारपेठेत अनेक दुकानावर खत उपलब्ध असतानाही शेतकऱ्यांना खत मिळत नाही. एका शेतकऱ्याला एकच खताची बॅग मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच कोरोनाचे सावट आणि त्यात व्यापाऱ्यांची मनमानी आणि शासकीय अधिकारी गप्प बसल्याने शेतकऱ्यांना खतासाठी आपला जीव धोक्यात टाकून बाजारपेठेतील भर पावसात रांगा लावून खत खरेदी करावा लागत आहे. तोही अपुरा म्हणजे फक्त एक बॅग. याबाबत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित दुकानदाराची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.AM News Developed by Kalavati Technologies