Corona In India : देशात गेल्या 24 तासात 81,484 कोरोनाबाधितांची भर; कोरोनाग्रस्तांचा आकडा 63 लाखांच्या पार

देशात सध्या 9 लाख 42 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरू असून, आतापर्यंत सुमारे 53 लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशात सुमारे 63 लाखांपेक्षा जास्त जणांना ग्रासलं आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान सुमारे 99 हजारांपेक्षा जास्त जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे आतापर्यंत सुमारे 53 लाखांपेक्षा जास्त जणांनी कोरोनावर मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासात 81 हजार 484 कोरोनाबाधितांची नव्याने भर पडली आहे. तर 1 हजार 95 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 63 लाख 94 हजार 69 एवढा झाला आहे. उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 99 हजार 773 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे देशात आतापर्यंत सुमारे 53 लाख 52 हजार 78 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टीसुद्धा देण्यात आली आहे. सध्या देशातील विविध भागात 9 लाख 42 हजार 217 जणांवर उपचार सुरु आहे.



AM News Developed by Kalavati Technologies