Corona In India: देशात गेल्या 24 तासात 70 हजार जणांना कोरोनाची लागण, कोरोनाग्रस्तांचा आकडा 61 लाखांच्या पार

देशात गेल्या 24 तासात 70,589 जणांना कोरोनाची लागण झाली असून, कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 61,45,292 एवढा झाला आहे

नवी दिल्ली । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा विषय बनला आहे. कोरोना या भयावह विषाणूनं देशभरात सुमारे 61 लाख जणांना ग्रासलं आहे. तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृतांचा आकडा सुद्धा वाढला असून, आतापर्यंत 96 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 51 लाख जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे.

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात 70 हजार 589 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 776 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 61 लाख 45 हजार 292 एवढा झाला आहे. त्यामधून सुमारे 96 हजार 318 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर दिलासादायक म्हणजे, 51 लाख 1 हजार 398 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुखरूप घरी सुद्धा पाठवण्यात आले आहे. सध्या देशातील विविध भागात 9 लाख 47 हजार 576 जणांवर उपचार सुरू आहे.

कोरोनाने जगभरातील सुमारे 200 पेक्षा जास्त देशात हाहाकार माजवला आहे. जगभरात सुमारे 3 कोटी 32 लाख जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 10 लाख जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 कोटी 30 लाख जणांनी कोरोनावर मात केली असून, त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.



AM News Developed by Kalavati Technologies