नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा कहर; गेल्या 24 तासात 134 रुग्णांची वाढ, दिवसभरात 10 मृत्यु

जिल्ह्यात आज दिवसभरात 10 जणांचा बळी गेला आहे

नांदेड | जिल्ह्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येची मोठी वाढ झाली असून जिल्ह्यात आजवरची सर्वात मोठी रुग्णसंख्या आढळल्याने खळबळ माजली आहे. वाढत्या बाधित रुग्णांच्या संख्येमुळे व मृत्यूच्या आकड्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे. गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल 134 रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र त्यानंतरही बाधित रुग्णसंख्येचा आकडा वाढतच आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1528 वर पोहचली आहे. आज 30 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दरम्यान दिवसभरात 10 जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 70 एवढी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या 284 नमुने तपासणी अहवालापैकी पैकी 89 नमूने निगेटीव्ह आले आहेत व 134 नमून्यांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकूण रुग्णसंख्या 1528 झाली आहे. आजवर डिस्चार्ज झालेले रुग्ण 770 असून उपचार घेत असलेले रुग्ण हे 677 आहेत. प्रलंबित असलेल्या स्वॅबची संख्या 264 एवढी आहे. दररोज वाढत असलेल्या शहरी रुग्णसंख्या बरोबर ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग मोठ्या वेगाने होत असल्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाच्या चिंतेत भर पडली आहे.AM News Developed by Kalavati Technologies