मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ 50 हजार रुपयांची मदत जाहीर करावी - विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शेतकर्‍यांना तात्काळ 50 हजारांची मदत जाहीर करावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे

परभणी । उद्धव ठाकरे यांनी याच शिवारात येऊन 25 हजार व 50 हजार देऊ असे मागील वेळी जाहीर केले होते. आता आपण स्वतः मुख्यमंत्री आहात आपण घोषित केलेली ती मदत तात्काळ शेतकर्‍यांना मिळवून द्यावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निळा शिवारातील पीक पाहणी करताना केले. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सोमवारी सायंकाळी परभणी जिल्ह्यातील निळा शिवारातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी शेतकर्‍यांशी त्यांनी संवाद साधला.

सर्वत्रच मोठे नुकसान झाले आहे. सर्वच पिके हातची गेली आहेत. सोयाबीन, तूर, उस, मका या पिकांसह फळबागांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. परिसरातील पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असून, आता कुठलेही पीक येणारच नाही अशीच परिस्थितीत आहे. शिवाय, शेतकर्‍यांनी शेता-शेतात ठेवलेल्या कडबीच्या गंजीही वाहून गेल्या. तर काही शेतकर्‍यांच्या गंजी पाण्यामुळे जागीच कुजल्या, सडल्याचे आपणास दिसून आले. शेतकर्‍यांच्या या संकटात आम्ही पाठीशी आहोत. आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी संघर्ष करू असेही फडणवीस म्हणाले.

आमच्या काळात आम्ही विमा कंपनीकडून पूर्णपणे पीकविमा मिळवून दिला. एवढेच नव्हे, ज्यांनी पीक विमा भरला नव्हता अशा शेतकर्‍यांना 50 टक्क्यापर्यंत मदत दिली. ज्या शेतकर्‍यांनी पीकविमा भरला त्यांना तर शंभर टक्के पीक विमा मिळाला आहे. मात्र, सद्यस्थितीत पीक विमा कंपनीकडून शेतकर्‍यांचा छळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. विमा कंपनीकडून शेतकर्‍यांच्या कोर्‍या फॉर्मवर सह्या घेतल्या जात असल्याचेही ते म्हणाले. विमा कंपनीने हा खोटारडेपणा तत्काळ बंद करावा अऩ्यथा कंपनीस धडा शिकवला जाईल, असाही इशारा फडणवीस यांनी यावेळी दिला.AM News Developed by Kalavati Technologies