मुंबई | राज्य प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) जवळपास 14 परीक्षांचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. एमएचटी सीईटी परीक्षा ही यामध्ये सर्वात महत्त्वाची मानली जाते. ही परिक्षा 13 ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये होणार आहे. तर एमबीएची सीईटी 14 आणि 15 मार्च रोजी असणार आहे. एलएलबी तृतीय वर्ष 28 जून आणि एलएलबी 5 व्या वर्षाची परिक्षा 12 एप्रिल रोजी घेतली जाणार आहे. राज्य प्रवेश परीक्षा कक्षाची प्रवेश नियंत्रण प्राधिकरणासोबत बुधवारी बैठक झाली.
या बैठकीमध्ये उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या अधिपत्याखाली असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. इंजिनिअरिंग आणि फार्मसी पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी प्रवेश परीक्षा 13 ते 23 एप्रिल या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. मेडिकल अभ्यासक्रमांच्या संदर्भातील सीईटी वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहेत. तीन व पाच वर्षीय विधी (लॉ), बीई / बीटेक, फार्मसी, एमबीए, आर्किटेक्चर , हॉटेल मॅनेजमेंट, बीपीएड, एमपीएड, बीए/ बीएस्सी बीएड इंटिग्रेटेड कोर्स अशा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी असलेल्या परीक्षांच्या संभाव्य तारखा देण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सीईटी सेलच्या अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा, असे आवाहन सीईटी सेल आयुक्त संदीप कदम यांच्याकडून करण्यात आले आहे.
अशा होणार परीक्षा
एमएचटी सीईटी - 13 ते 23 एप्रिल
एमबीए/एमएमएस - 14 आणि 15 मार्च
एमसीए - 28 मार्च
मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - 16 मे
बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट - 10 मे
एलएलबी 5 वर्षे - 12 एप्रिल
एलएलबी 3 वर्षे - 28 जून
बीपीएड - 11 मे
बीएड/एमएड - 12 मे
एमपीएड - 14 मे
बीए/बीएससी बीएड - 20 मे
एमएड - 26 मे