बुलडाणा । कोरोनामुळे मृत्यू झाल्याची लपवली माहिती सहा जणांवर गुन्हा दाखल

उपचारादरम्यान या रुग्णाचा ९ मे रोजी मृत्यू झाला

बुलडाणा । वडीलांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती लपवून ठेवणाऱ्या कुटुंबातील सहा जणांना गुरुवारी बुलडाणा येथे हॉस्पिटल कारंटीन केले. याप्रकरणी मलकापूर तालुक्यातील नरवेल येथील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना बुलडाणा कोविड रुग्णालयात क्वारंटीन करण्यात आले आहे. हे कुटूंब मुळचे नरवेल येथील असून, ते मुंबई येथे वास्तव्यास होते. गावातील सजग नागरिकाने हे वास्तव समोर आणले.

संत मुक्ताबाई चाळ रोड नंबर ३४ वागळे इस्टेट जिल्हा ठाणे येथे वास्तव्य असलेल्या एका इसमाला सर्दी, ताप, खोकला व श्वास घेण्याचा त्रास होत असल्याच्या कारणास्तव कळवा जि. ठाणे येथील रुग्णालयात ७ मे रोजी भरती केले होते. उपचारादरम्यान या रुग्णाचा ९ मे रोजी मृत्यू झाला. मृत्यूनंतर मृतकाच्या मुलाने व कुटुंबातील सदस्यांनी पित्याचा अंत्यविधी घाईघाईने उरकत एका ट्रकद्वारे मलकापूरची वाट धरली. प्रवास सुरू असताना वाटेतच ‘तुमच्या पित्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह’ आल्याची बाब संबंधित रुग्णालय प्रशासनाकडून मृतकाच्या मुलाला भ्रमणध्वनीद्वारे कळविली होती. असे असतानाही ही बाब त्या परिवारातील सदस्यांनी लपवून ठेवत मलकापूर गाठले.

येथे आल्यावर स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून होम क्वारंटीन करवून घेतले. नरवेल येथील एका नागरिकाला वास्तव परिस्थिती कळताच त्याने प्रशासनाला सजग केले. या बाबीची तत्काळ दखल घेत नरवेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आनंद माळी यांनी गावात जाऊन त्या कुटुंबातील १ पुरुष, ३ महिला तथा २ पाच वर्षीय बालक असे एकूण ६ सदस्यांना ताब्यात घेत बुलडाणा येथे हॉस्पिटल क्वारंटीन केले. या कारवाईमुळे लपवून ठेवलेली वास्तव माहिती उघड झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.AM News Developed by Kalavati Technologies