मुंबई । ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री रेखा यांचा मुंबईतील बंगला बीएमसीने सील केला आहे. रेखा यांचा बॉडीगार्ड कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बीएमसीने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलले. शिवाय त्यांच्या बंगल्याच्या भिंतीवर कंटेन्मेंट झोन असल्याचे पोस्टरही लावण्यात आले आहे.
तथापि, यापूर्वी करण जोहर, जान्हवी कपूर आणि आमिर खान यांचा स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. आता रेखा यांचा सुरक्षारक्षकही पॉझिटिव्ह आढळल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आजच बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांचे सुपुत्र अभिषेक बच्चन हे दोघेही कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. यामुळे बॉलीवूडमध्येही कोरोनाने चांगलेच हातपाय पसरल्याचे बोलले जात असून चाहते ते बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
वांद्रे येथील बँडस्टँड परिसरात रेखा यांचा सी-स्प्रिंग नावाचा बंगला आहे. सूत्रांनुसार, त्यांच्या बंगल्याबाहेर कायम दोन सुरक्षारक्षक तैनात असतात. त्यांच्यापैकीच एकाची कोरोना चाचणी काही दिवसांपूर्वीच सकारात्मक आली होती. त्याच्यावर सध्या बीकेसी येथे कोविड केंद्रात उपचार सुरू आहेत.