'करोना प्यार है'... कोरोना व्हायरसवर येणार चित्रपट, सिनेसृष्टीत चर्चा

इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनकडे करोनावर आधारित चित्रपटांच्या नावांची यादीच आली आहे.

मुंबई | कधी कधी आपले चित्रपटवाले काय करतील याचा नेम नसतो. आता हेच बघा ना, विदेशी वाऱ्यातून वाहत आलेला कोरोना विषाणू प्रत्येक देशात दाखल झाला आहे. जगभरातील विविध देशांनंतर आता भारताला आणि महाराष्ट्रालाही कोरोनाने ग्रासले आहे. मुंबई पुणे शहरात तर कोरोना जास्त पसरला आहे. या कोरोनाचा विषाणूचा फटका मनोरंजन विश्वालाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. अनेक चित्रपटांचे शुटिंगही बंद करण्यात आले आहेत. दरम्यान आता कोरोनावर चित्रपट येणार असल्याच्या चर्चा आहेत.

या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्मिती करण्यासाठी निर्मात्यांमध्ये निदान हिंदी चित्रपटसृष्टीत स्पर्धा लागली आहे. करोनाशी संबंधित चित्रपटाचे शीर्षक नोंदवण्यासाठी निर्मात्यांमध्ये चढउतार सुरू आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, यात ‘करोना प्यार है’ या शीर्षकाचाही समावेश आहे.

राकेश रोशन दिग्दर्शित हृतिक रोशन व अमिषा पटेल यांचा ‘कहो ना प्यार है’ ( 2000) हा म्युझिकल मनोरंजन हिट चित्रपट सर्वांनाच माहिती आहे. याच चित्रपटाची कथा पुढे नेत अर्थात सिक्वेल म्हणून ‘करोना प्यार है’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इरॉस इंटरनॅशनल फिल्म्स’ने या नावाची नोंदणी केली आहे. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर एक प्रेमकथा या चित्रपटात दाखवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र अशा पध्दतीने मराठी चित्रपटाचे नाव नोंदणी झालेले नाही ही समाधानाची गोष्ट आहे.

‘करोना प्यार है’ या व्यतिरिक्त ‘वुहान वेपन करोना’, ‘करोना द ब्लॅक डे’, ‘करोना द इमर्जन्सी’, ‘डेडली करोना’ यांसारख्या चित्रपटांच्या नावांची नोंदणी झाली आहे. करोना विषाणूच्या भीतीने सध्या जरी बॉक्स ऑफिस बंद असलं तरी भविष्यात त्यावरच आधारित चित्रपट निर्मितीसाठी आतापासूनच तयारी केली जात आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनकडे ( अर्थात इम्पा) करोनावर आधारित चित्रपटांच्या नावांची यादीच आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies