बोदगव्हाण जिल्हा परिषद शाळेच्या छताला गेले तडे! जीवित हानी झाल्यास जबाबदार कोण

सात दिवसाचा दिला होता प्रशासनाला अल्टिमेटम

यवतमाळ । जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असताना तालुक्यातील बोदगव्हान येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरावस्था झाल्याने विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करताना अडचणी निर्माण होत आहे. याबाबत वारंवार दारव्हा पंचायत समिती व शिक्षण विभागाला निवेदन देऊनही लक्ष देण्यात येत नसल्याने पालक संतप्त झाले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात शाळेची दुरुस्ती न केल्यास मुलं शाळेत पाठविणार नसल्याचा सज्जड इशारा बोदगव्हाण येथील नागरिकांनी दारव्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

एकीकडे सर्व शिक्षा अभियानाचा गाजावाजा करीत "स्कूल चले हम "या जाहिरातीच्या माध्यमातून शासनाने ग्रामीण भागातील विद्यार्थी हा शिक्षणाच्या प्रवाहात यावा यासाठी मागील काळात मोठे प्रयत्न केले आहे. तसेच शाळांच्या नवीन इमारतीवरही मोठा खर्च केला आहे. तर सध्या संगणकीय जगात वावरताना जास्तीत-जास्त डिजिटल शाळा करण्यासाठी शासनाचा मोठा प्रयत्न आहे, असे असताना दारव्हा तालुक्यातील बोदगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीच्या छताला तडे जाऊन गज उघडा पडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र तरी सुद्धा दारव्हा पंचायत समिती प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. वर्ग खोल्यांमध्ये व शाळेच्या व्हरांड्यात पावसाचे पाणी गळत असल्याने शाळेचा छत कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीतीपोटी काही शिक्षक शाळेच्या मैदानात वर्ग घेताना दिसत आहे. वेळोवेळी बोदगव्हाण येथील पालकांनी ग्रामपंचायत पांढुर्णा, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना आपल्या समस्यांचे निवेदन देऊनही लक्ष देण्यात येत नसल्याने आता पालकांनी भविष्यात मोठा धोका होण्याची शक्यता असल्याचे सांगित मुलांना शाळेत न पाठविण्याचे ठरविले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून बोदगव्हाण येथील शाळेत विद्यार्थी न पाठविण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाला जाग येत नसल्यामुळे बोदगव्हाण येथील नागरिक आता शाळेलाच कुलूप लावण्याच्या विचारात असल्याचे दिसत आहे.AM News Developed by Kalavati Technologies