परभणीत संचारबंदीमध्ये बोर्डाकडून विद्यार्थ्यांच्या चौकशीचा घाट

परभणी जिल्ह्यातील दिडशेच्या वर विद्यार्थी व पालकांची उपस्थिती

परभणी । कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने संचारबंदीचे आदेश दिलेले असतांनाही माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाने बारावी परिक्षेत कॉपी करतांना पकडलेल्या विद्यार्थ्यांना चौकशीसाठी बोलावले. तब्बल दिडशेच्यावर विद्यार्थ्यांची आज उपस्थिती होती. मात्र संचारबंदीत एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना बोलावलेच कसे असा प्रश्‍न आता पालकांतुन विचारला जात आहे.फेब्रुवारी/मार्च महिन्यात इयत्ता 12 वीच्या परिक्षा जिल्हाभरात विविध केंद्रावर घेण्यात आल्या.

या परिक्षेच्या काळात कॉपी करतांना विद्यार्थी आढळून आले. त्यावेळी त्यांच्यावर केंद्र प्रमुखांनी कारवाईही केली होती. या संदर्भात चौकशी करण्यासाठी विद्यार्थ्यांना सोमवारी परभणी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात बोलावले होते. याठिकाणी जिल्हाभरातुन जवळपास 150 विद्यार्थी व पालक उपस्थित होते.दरम्यान राज्यभरात सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भात मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

परभणी जिल्ह्यातही सातत्याने रूग्ण संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात संचारबंदी लागु केली आहे. असे असतांनाही बोर्डाने विद्यार्थ्यांना बोलावलेच कसे? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी पालकांनी आपल्या पाल्यासह याठिकाणी उपस्थिती लावून आपले म्हणणे मांडले.

बोर्डाने देखील विद्यार्थ्यांच्या चौकशीचा घाट कशासाठी घातला असा प्रश्‍न पालकांतून व्यक्त केला जात आहे. एकंदरीतच बोर्डाच्या या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये मात्र तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies