मोठी बातमी : पुलवामात चकमक सुरू; एका जवानाला वीरमरण, तर एका अतिरेक्याचा खात्मा

पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलाने दोन अतिरेक्यांना घेरले

पुलवामा । जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात पुन्हा एकदा अतिरेकी आणि जवानांमध्ये चकमक झाली आहे. पुलवामा जिल्ह्यातील कामाराजिपोरा येथे आज सकाळी सुरक्षा दलांने सफरचंदाच्या बागेत दोन अतिरेक्यांना घेरले. या चकमकीत आतापर्यंत एक दहशतवादी ठार झाला आहे. तर, चकमकी दरम्यान एक जवान शहीद झाल्याची बातमी समोर येत आहे.या चकमकी दरम्यान एक जवान गंभीर जखमी झाला होता. त्या जवानाला तातडीने श्रीनगरच्या 92 बेस आर्मी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

मात्र उपचारा दरम्यान हा जवान शहीद झाला आहे. याशिवाय आणखी एक तरुण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. सध्या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी, पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषा ओलांडून घुसखोरी करत असलेल्या एका अतिरेक्याला भारतीय सैन्याने ठार केले होते. त्यासोबतच दोन अतिरेकी जखमीही झाले होते. घटनास्थळावरून एके-47 असॉल्ट रायफल, दोन एके-47 मॅगजिन आणि काही खाद्यपदार्थ जप्त करण्यात आले.AM News Developed by Kalavati Technologies