मोठी बातमी ! 1 जुलैपासून ठाणे शहरात पुन्हा टाळेबंदी, बैठकीत निर्णय

1 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठाणे | कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता ठाण्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता 1 जुलैपासून ठाणे महापालिका क्षेत्रात पुन्हा टाळेबंदी केली जाणार आहे. यामध्ये लॉकडाऊन 1 चे सर्व नियम आणि निर्बंध लागू करण्यात येणार आहे. ठाणे पोलीस आणि ठाणे महापालिका आयुक्तांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यानुसार आता 1 जुलैच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू होईल. हे लॉकडाऊन 11 जुलैपर्यंत असणार आहे. या काळात भाजी तसेच मासळी बाजार देखील बंद असणार आहे. वाहतूक व्यवस्था जरी बंद ठेवण्यात येणार असली तरी अत्यावश्यक सेवा सुरू असणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.याआधी उल्हानसगर आणि भिवंडीत लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. तर नवी मुंबईतील कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आला आहे.

दरम्यान निर्बंध शिथील झाल्याने लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून ठाणे पोलिसांनी अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी व्हिडीओच्या माध्यमातून लोकांना नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे. तसेच लॉकडाऊच्या काळात जो कुणी घराबाहेर पडेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाण्यासह, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर या चार महानगरपालिकांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्यानं मोठी चिंता निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टेंसिंगचे पालन करा, तसेच काम असेल तरच घराबाहेर पडा असा सूचना देण्यात येऊनही नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. त्यामुळं कोरोनाचा प्रसार हा झपाट्यानं झाला आहे. त्यामुळं परत एकदा ठाण्यात टाळेबंदी करण्याची वेळ आली आहे.AM News Developed by Kalavati Technologies