अयोध्येतील सुरक्षेत वाढ, 6 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर पोलीसांकडून खबरदारी

रामजन्मभूमी परिसरात हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात.

नवी दिल्ली | 6 डिसेंबर रोजी बाबरी मशीद पतन दिन आहे. या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे रामजन्मभूमी परिसरातील सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनुज कुमार झा यांनी ही माहिती दिली. नुकताच अयोध्येतील वादग्रस्त जमिनीचा निकाल लागला. यामध्ये राम मंदिराच्या बाजूने निकाल लागला.

अनुज कुमार झा यांनी सांगितल्या नुसार, शांतता आणि सद्भाव कायम ठेवणे याकडे लक्ष दिले जात आहे. अयोध्येतील नागरिक परिपक्वता दाखवून शांतता राखतील असा विश्वासही अनुज कुमार झा यांनी व्यक्त केला आहे. अयोध्येतील सुरक्षा चार पातळीवर ठेवण्यात आली आहे. रेड झोनमध्ये 2.77 एकर जागेचा समावेश करण्यात आला आहे. यलो झोनमध्ये शहर आणि ग्रीन झोनमध्ये जिल्हा व ब्लू झोनमध्ये शेजारील परिसर यांचा समावेश करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात रामजन्मभूमीबाबत निर्णय दिला आहे. रामजन्मभूमी परिसरात हजारो भक्त दर्शनासाठी येत असतात. यामुळे या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. या भागामध्ये 28 डिसेंबरपर्यंत कलम 144 लागू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी झा म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर अयोध्येतील लोकांनी अत्यंत परिपक्वता दाखवली आहे. तसेच त्यांनी शांतताही राखली आहे. मात्र खरबरदारीचा उपाय म्हणून अयोध्येतील परिस्थितीवर सुरक्षा जवान लक्ष ठेवून आहेत. सोशल मीडियातील हालचालींवर पोलीसांचे बारीक लक्ष आहे. शहरातील हनुमान गढी, कनक भवन, दशरथ महाल आदी ठिकाणी 45 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत.AM News Developed by Kalavati Technologies