सिल्लोडमध्ये बोगस बियाणे व किटकनाशके उत्पादन करणाऱ्या कंपनीचा पर्दाफाश, कृषी विभागाची कारवाई

सिल्लोड तालुक्यातील भवन या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून सोयाबीन बियाणे व किटकनाशके उत्पादन करणारी बोगस कंपनी उघडकीस आणली.

औरंगाबाद | तालुक्यातील मौजे बेंबळेची वाडी या गावातील शेतकरी प्रल्हाद मोतीराम बहुरे यांनी मे.किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर 15, बाळापुर फाटा, बीड बायपास औरंगाबाद असा सोयाबीन बियाणे बॅगवर पत्ता छापलेल्या व मे.किसान अॅग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, गट नंबर 22, माणिक नगर भवन तालुका सिल्लोड या ठिकाणावरून पावती क्रमांक 0123 (दि.10) जून 2020 च्या नुसार सोयाबिन के 228 या वाणाच्या लॉट क्रमांक 0077 च्या दोन बॅग खरेदी केल्या होत्या. परंतु या दोन्ही बॅगमधील सोयाबीन बियाणे उगवले नसल्याची तक्रार संबंधित शेतकऱ्यांनी औरंगाबाद पंचायत समिती या ठिकाणी केली होती. तेथील कृषी अधिकाऱ्यांच्या पाहाणीमध्ये मे.किसान ॲग्री टेक्नॉलॉजी प्रा.ली.,नावाची कंपनी बीड बायपास येथे अस्तित्वात नसल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी आनंद गंजेवार कृषी विकास अधिकारी यांना कल्पना दिली.

सदरील बियाणे पावतीवरील व बॅगवरील ऊत्पादकाचा पत्ता भवन तालुका सिल्लोड येथील असल्याचे आढळुन आल्याने श्री आनंद गंजेवार कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांनी पंचायत समिती सिल्लोड चे गुणनियंत्रण निरीक्षक तथा कृषी अधिकारी संजय व्यास यांना याकामी संपूर्ण तपास करण्याचे आदेशीत केले. त्यानुसार काल दिनांक 07 जुलै 2020 रोजी कृषी अधिकारी संजय व्यास यांनी विभागीय स्तरावरील भरारी पथकाचे प्रशांत पवार,तंत्र अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय औरंगाबाद, संजय हिवाळे मोहिम अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद, दिपक गवळी तालुका कृषी अधिकारी सिल्लोड, पाडळे, मंडळ कृषी अधिकारी, शैलेश सरसमकर व विश्वास बनसोडे विस्तार अधिकारी (कृषि), कृषी सहाय्यक श्री कस्तुरकर यांचेसह भवन येथील तसवर बेग मिर्झा बेग यांचे दुकान व व्यवसाय घर क्रमांक 22 भवन, माणिक नगर,तालुका सिल्लोड या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता छापा टाकला. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांना याठिकाणी 107 बॅग सोयाबीन बियाणे आढळून आले ज्याची एकूण किंमत 3,97,500/- रुपये आहे.

तसेच या ठिकाणी बियाणे पॅकिंग करण्यासाठी लागणाऱ्या पॅकिंग बॅग, पायाभूत व सत्यतादर्शक दर्शक बियाण्याचे बनावट टॅग,बिल बुक, पावती पुस्तके, वजन काटा या बाबी आढळून आल्या. तसेच या ठिकाणी संबंधित व्यक्ती मे. किसान अग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड नावाने बनावट, विना परवाना बियाणे ऊत्पादन व विक्री करणा-या बनावट कंपनी बरोबरच बनावट किटकनाशकाची ऊत्पादन, वितरण व विक्री अवैधरित्या करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे येथून 7268/- रुपये किमतीचे बनावट कीटकनाशके, कीटकनाशकाचे लेबल, कीटकनाशके बनवण्यासाठी लागणारी सामग्री, इत्यादी साहित्य जप्त केले आहे.

सदर प्रकरणी पोलीस स्टेशन सिल्लोड (ग्रामीण) याठिकाणी दि. 8 जुलै 2020 रोजी पहाटे उशिरा 4:15 वा. गु. र.क्र. 212/20 अन्वये तसवर बेग मिर्झा बेग वय वर्ष बत्तीस व त्यांची बनावट कंपनी मे.किसान ॲग्री टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड घर क्रमांक 22, भवन, माणिक नगर, तालुका सिल्लोड यांचे विरुद्ध भा. द.वी. 34, 468 बियाणे अधिनियम 1966, नियम 1968, बियाणे नियंत्रण आदेश 1983, कीटकनाशके अधिनियम 1968 व कीटकनाशके नियम 1971 चे विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सदरील कारवाई विभागीय कृषी सहसंचालक औरंगाबाद डी.एल जाधव यांचे आदेशान्वये डॉ. तुकाराम मोटे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी औरंगाबाद व आनंद गंजेवार कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद यांचे मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बनावट बियाणे, खते व कीटकनाशके कोणी विनापरवाना विक्री करीत असल्यास फसवणूक होण्याची शक्यता असल्याने कोणत्त्याही अमिषास बळी पडु नये व या व्यक्तीकडून खरेदी करू नये तसेच याबाबतची माहिती कृषी विभागास किंवा पोलिसांना द्यावी असे आवाहन केले आहे.AM News Developed by Kalavati Technologies