औरंगाबाद | शेलुद येथे गणेश मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर संपन्न

सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे

औरंगाबाद | देशभरात कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानामुळे जवळपास 3 महिन्यांपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. या लॉकडाऊनच्या काळात अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुडवटा निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने शक्य असल्यास रक्तदान करावे असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काही दिवसांपुर्वी केले होते. हीच बाब लक्षात घेता औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी नजीक असलेल्या शेलुद येथील सार्वजनिक गणेश मंडळातील तरुणांनी रक्तदानाचा अभिनव उपक्रम केला आहे.

अवघे जग कोरोना या आजाराशी लढत असतां, भारतासह महाराष्ट्रात रक्ताचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाला हरवण्यासाठी ग्रामीण भागातील तरुण सरसावले आहेत. दरवर्षी सार्वजनिक गणेश मंडळ शेलुद यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. पण यावर्षी रक्ताचा पुरवठा कमी पडल्याने शेलुद येथील सार्वजनिक गणेश मंडळातील तरुणांनी डॉ. हेडगेवार रुग्णालय यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या दत्ताजी भाले रक्तपेढीतून गावातील काही निवडक तरुणांना फोन करून रक्तदानाची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देत शेलुद मधील तरुणांनी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी जवळपास 35 तरुणांनी रक्तदान केले.

दरम्यान या रक्तदानाची सुरुवात गावातील ग्रामदैवत असलेल्या मारोतीला नारळ फोडून करण्यात आली. नवतरुणांनी सुरु केलेल्या या रक्तदान शिबिराला गावातील अनेक नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. या शिबिरातून जवळपास 35 बॅग रक्त संकलन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भिका चौधरी, ग्रामपंचायत सदस्य, मधुकर चौधरी, ऋषी नरवडे, पोलिस पाटील, भीमराव चौधरी, यांच्यासह गावातील नवतरुणांची उपस्थिती होती.AM News Developed by Kalavati Technologies