ठाणे | डोंबिवली पूर्वेतील कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथील कोविड सेंटर मधून गुरुवारी सकाळी बेपत्ता झालेल्या 53 वर्षीय कोरोना बाधित रुग्णाचा मृतदेह पश्चिमेतील खाडीत सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे येथील सुरक्षा यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणी विष्णू नगर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली असून या रुग्णाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.
डोंबिवली पश्चिम येथील मोठा गाव येथे राहणारे 53 वर्षीय रुग्ण यांचा डोंबिवली पूर्व येथे चावी बनवण्याचा व्यवसाय आहे. 20 जुलै रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे डोंबिवली पूर्व येथील कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या हभप सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलातील स्व. सुरेंद्र वाजपेयी बंदिस्त क्रीडा संकुलातील कोविड सेंटर येथे उपचारासाठी त्यांना दाखल करण्यात आले होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यामुळे 8 दिवसांतच त्यांना घरी पाठवण्यात आले होते. घरी आल्यानंतर पुन्हा त्यांना श्वासोच्छवासाचा त्रास सुरू झाला आणि त्यांना पुन्हा त्याच कोव्हीड सेंटरमध्ये पुन्हा दाखल करण्यात आले होते अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
दरम्यान आज भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी मृत कोरोना रुग्णाच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी अशाप्रकारे यापूर्वीही अनेक घटना घडल्या असून याला सरकारचा आणि स्थानिक यंत्रणांचा नियोजनशून्य कारभार कारणीभूत असल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला. तसंच प्रत्येक कोविड केअर सेंटरवर रुग्णांचं काऊन्सिलिंग करण्यासाठी तज्ज्ञांची नेमणूक करण्याची मागणी त्यांनी केली. मृत व्यक्तीच्या मुलानेही या सगळ्याला कोविड केअर सेंटरचा ढिसाळ कारभार कारणीभूत असल्याचा आरोप केला. तर शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मात्र या सगळ्यात कुणाचा हलगर्जीपणा झाल्याचं दिसत नसल्याचं सांगत यापुढे केडीएमसीच्या प्रत्येक कोव्हीड केअर सेंटरमध्ये काऊन्सिंलर नेमण्यात येणार असल्याचं सांगितलं.