अमरावती । प्रेमविवाह न करण्याच्या शपथ प्रकरणी प्राचार्यांसह तिघांचे निलंबन

निलंबन मागे घेण्यासाठी विद्यार्थीनींचे महाविद्यालयाबाहेर आंदोलन

अमरावती । अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे येथील महिला कला वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थीनींना प्राध्यापकांनी प्रेम व प्रेमविवाह न करण्याची शपथ १३ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष शिबीरात टेंभुर्णी येथे दिली होती. या प्रकरणात विदर्भ युथ वेलफेअर सोसायटीने प्राचार्यांसह दोघांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. याचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर सोसायटीने एका चौकशी समितीमार्फत चौकशी सुरू झाली असून समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. प्रदीप दंदे व रासेयो कार्यक्रम अधिकारी कापसे यांना निलंबीत करण्यात आले. तसेच प्राचार्य पदाचा पदभार डॉ. सिमा जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला होता.

यानंतर गुरूवारी सकाळपासुन विद्यार्थीनींनी महाविद्यालयाला कुलुप लावून बाहेर आंदोलनाचा सुरूवात केली आहे. टेंभुर्णी येथील शपथ प्रकरणी करण्यात आलेल्या तीन प्राध्यापकांचे निलंबन जोपर्यंत मागे घेतले जाणार नाही तोपर्यंत महाविद्यालयातील सर्व तासिकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता महाविद्यालय तसेच संस्थेतर्फे कोणती भूमिका घेतली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.AM News Developed by Kalavati Technologies