अहमदनगर । एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीचं विदारक चित्र, विशेष महानिरीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली

अवैध धंद्यांच्याबाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय घेईल का?

अहमदनगर । शहराच्या औद्योगिक वसाहतीला उतरती कळा लागली असतानाच तेथील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे फोफावल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. शहरातील औद्योगिक वसाहतीत शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आणि परराज्यातील कामगार आहेत. काही ठिकाणी नागरी वसाहती देखील आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या या औद्योगिक वसाहतीला अवैध धंद्यांनी घेरलं आहे. सोरट, मटका, बिंगो जुगार, गावठी दारू, सुगंधी तंबाखू उत्पादनाचे छोटे कारखाने, वेश्या व्यवसाय, चोर्‍या, दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळ्या, लुटीच्या तयारीत असलेले टोळक्यांनी डोकं वर काढलं आहे.

कामगारांच्या पगाराच्या दिवशी सोरट, मटका, बिंगो आणि वेश्या व्यवसायाला तेजी येते. त्यावेळी दलाल कार्यरत होतात. सुगंधी तंबाखुचे उत्पादन 24 तास सुरू आहे. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमध्ये दोन ते तीन दिवसआड चोर्‍याच्या तक्रारी आहेत. यामुळं एमआयडीसी पोलीस या अवैध धंद्यांना चाप लावण्यासाठी काय करतात? असा प्रश्न उपस्थित केला जावू लागला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचा प्रभारी कारभार सुरू आहे. त्यातच शहरालगत असलेलं औद्योगिक क्षेत्रातील कामगार अवैध धंद्यांच्या विळख्यात ओढला जात आहे. या अवैध धंद्याला बळ मिळत आहे, ते दलालांचं. यात युवक, तरुण अधिकपणे आहेत. एमआयडीसी पोलिसांना क्षेत्रात सुरू असलेल्या अवैध धंद्यांची माहिती नाही, असे होणं शक्य नाही. खुलेपणानं सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई का नाही? हा प्रश्न आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्वी छुप्यापद्धतीने अवैध व्यवसाय होत होते. आता ते खुल्यापणां होत असल्यानं या व्यवसायांना खाकीचं बळ असल्याची शंका उपस्थित केली जात आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोर्जे यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात बैठक घेऊन जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेतला होता. त्यात अवैध धंद्यांना चाप लावा अशा सूचना देखील दिल्या असणारच. परंतु त्यांच्या आदेशाला एमआयडीसी पोलिसांनी केराची टोपली दाखविल्याचे दिसते आहे. Am News ने एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या औद्योगिक वसाहती क्षेत्रात अवैध धंद्यांच्याबाबत केलेल्या स्टिंग ऑपरेशनची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय घेईल का? असा सवाल आहे.AM News Developed by Kalavati Technologies