अजित पवारच आमच्याकडे आले होते, देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच राज्याला स्थिर सरकार देता येईल असे अजित पवार म्हणाले होते

मुंबई | राज्यात आता महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झाले आहे. मात्र यापूर्वी जवळपास महिनाभर सत्तानाट्य रंगले होते. देवेंद्र फडणवीसांनी एका रात्रीत राष्ट्रवादीच्या अजित पवारांसोबत सरकार स्थापन केल्याने प्रचंड गोंधळ उडाला होता. या सर्व सत्ता नाट्यानंतर पहिल्यांताज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना यावर भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेवेळी आम्ही अजित पवार यांच्याकडे गेलो नव्हतो तर ते स्वतः आमच्याकडे आले होते असा खुलासा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे.

यासोबतच फडणवीस म्हणाले की, 23 नोव्हेंबरला जो शपथविधी झाला होता. त्यापूर्वी अजित पवार यांनी आमच्याकडे येऊन सांगितले की, काँग्रेस आणि शिवसेनेसोबत मिळून तीन पक्षाचे सरकार जास्त काळ टिकणे शक्य होईल असे वाटत नाही. सध्या राज्याला स्थिर सरकार देण्याची गरज आहे. भाजपसोबत सत्ता स्थापन केली तरच राज्याला स्थिर सरकार देता येईल. कारण त्यांच्याकडे आमदारांचा जास्त आकडा आहे. असे अजित पवार म्हणाले होते. तसेच मी राष्ट्रवादीच्या काही आमदारांसोबत चर्चा केली असल्याचेही अजित पवार म्हणाले होते असे फडणवीसांनी सांगितले.AM News Developed by Kalavati Technologies