पेट्रोल घेऊन जाणारा टँकर उलटला, स्थानिकांची पेट्रोल भरण्यासाठी गर्दी

चोरट्यांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क ड्रम, बाटल्या, मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे.

रायगड | म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटात पेट्रोल घेऊन जाणारा टँकर पलटी झाल्यानं पेट्रोल चोरी करण्यासाठी नागरिकांनी जीव धोक्यात घातल्याची घटना समोर आली आहे. स्थानिक नागरिकांनी पेट्रोल चोरीसाठी चक्क ड्रम, बाटल्या, मिळेल ते हातात घेऊन धावपळ केली आहे. टँकरमध्ये जवळपास ८ हजार लीटर पेट्रोल आणि चार हजार लीटर डिझेल होते, यामधून चोरट्यांनी अंदाजे २ ते ३ हजार लीटर पेट्रोल व डिझेल वर डल्ला मारलाय उर्वरीत पेट्रोल व डिझेल पैकी ४ ते ५ हजार लिटर गळतीमुळे वाहून गेलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी भारत पेट्रोलियम या कंपनीचा पेट्रोल व डिझलने भरलेला टँकर रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात असणार्‍या घोणसे घाटात चालकाला तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने पलटी झाला. हा टँकर पलटी झाल्याचे समजताच परिसरात असणार्‍या गावातील नागरिकांनी पेट्रोल चोरी करण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून धावपळ केली.

चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने अपघात झाला असून या अपघातात टँकरच चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहे. मात्र दरम्यान अपघाताची माहिती मिळताच म्हसळा तहसिलदार शरद गोसावी, सर्कल दत्ता कर्चे व पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे व त्यांचा कर्मचार्‍यांनी क्रेनच मदतीने हा ट्रंकर रस्त्याचा बाजूला केला. मात्र १०० - २०० रुपयांच्या पेट्रोलच्या चोरीसाठी ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घातला. कडक उन्हामुळे या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता होती.



AM News Developed by Kalavati Technologies