शिरपूर तालुक्यातील ग्रामपंचायतीत 80 टक्के विकास निधी पडून

ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत माहिती उघड

धुळे | विविध विकास कामांसाठी ग्रामपंचायतींना पेसा व 14 वा वित्त आयोगाचा निधी दिला जातो. मात्र आर्थिक वर्षे पूर्ण होण्यास फक्त एक महिना शिल्लक असतांनाच धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील बऱ्याच ग्रामपंचायतीत निधी खर्च न होता पडून असल्याची धक्कादायक माहिती आढावा बैठकीत समोर आली.

शिरपूर पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ. तुषार रंधे व सीईओ वानमती सी यांनी आढावा बैठक बोलाविली होती. या बैठकीत तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामसेवक उपस्थित होते. ग्रामसेवकांचा गावानुसार आढावा घेतला असता मिळालेल्या 14 वा वित्त आयोगाच्या निधीचा तपशील पाहून बहुतांश ग्रामपंचायतमध्ये 80 टक्के पेक्षा अधिक निधी खर्च केलाच नसल्याचे आढळले. जिल्हा परिषद अध्यक्ष व सीईओ यांनी ग्रामसेवकांना जाब विचारला असता 30 एप्रिलच्या आत संपूर्ण निधी खर्च करण्याचे आश्वासन ग्रामसेवकांनी दिले. आता प्रश्न असा उपस्थित होतो की फक्त दोन महिन्यात होणाऱ्या कामांची गुणवत्ता कशी राहील? यामुळे गावपातळीवर शासकीय योजनांचा कसा बोजवारा उडतो हे दिसून येते.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ग्रामसेवकांनी बिडीओ शिंदे यांच्यावर सूड बुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप केला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषार रंधे, उपाध्यक्षा कुसुम निकम, सभापती रामकृष्ण खलाने, धरती देवरे, मंगला पाटील, मोगरा पाडवी, सीईओ वानमती सी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मालोदे, तडवी, प.स.सभापती सत्तारसिंग पावरा, उपसभापती धनश्री बोरसे, बीडीओ वाय. डी.शिंदे उपस्थित होते.AM News Developed by Kalavati Technologies