वैद्यकीय प्रवेशातील 70:30 कोटा पद्धत रद्द - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख

राज्यातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियातील कोटा पद्धत सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

मुंबई । राज्यातील वैद्यकीय प्रवेशासाठी 70:30 कोटा ही पद्धत रद्द करण्यात आली आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी आज सभागृहात याबाबत घोषणा केली. 70:30 कोटा पद्धतीमुळे गुणवंत विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशापासून वंचित राहतात. त्यामुळे राज्य सरकारने कोटा पद्धत रद्द करत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सांगितले आहे.

वैद्यकीय प्रवेशात जात तसेच प्रवर्गनिहाय आरक्षण होते. त्यामुळे 70:30 ही पध्दत मराठवाडा आणि विर्दभातील विद्यार्थ्यांवर अन्याय करत होती. या कोटा पद्धतीमुळे विद्यार्थ्यांवर होत असलेला अन्याय थांबवण्यासाठी तत्कालीन विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमरसिंह पंडित आमदार सतिश चव्हाण यांनी हा कोटा रद्द करण्याची मागणी लावून धरली होती.

वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेतील 70:30 कोटा पद्धतीबाबत नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. त्यानंतर आज अमित देशमुख यांनी विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सभागृहात 70:30 ही कोटा पद्धत रद्द करत असल्याची घोषणा केली.AM News Developed by Kalavati Technologies