येरवडा कारागृहातून 5 जण फरार, सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

खिडकीचे गज तोडून पहाटेच्या सुमारास 5 जण फरार, कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी वेळ

पुणे । पुण्यातील येरवडा तात्पुरत्या कारागृहातून मोक्यासह गंभीर गुन्ह्यातील पाच आरोपी गुरुवारी पहाटे खिडकीचे गज तोडून पळून गेल्याची घटना गुरुवारी पहाटे घडली. येरवडा तात्पुरत्या कारागृहातून आरोपी पळून जाण्याची ही चौथी घटना आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीनबंदी तात्पुरत्या कारागृहात ठेवण्यात येत आहे. वारंवार बंदी पळून जाण्याच्या घटनेमुळे कारागृहाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

देवगण अजिनाथ चव्हाण, गणेश आजिनाथ चव्हाण( दोघेही रा. बोरावके नगर, तालुका दौंड, पुणे), अक्षय कोडक्या चव्हाण, ( रा. लिंगाळी माळवाडी, तालुका दौंड, पुणे), अजिंक्य उत्तम कांबळे (रा. सहकार नगर टिळेकर वाडी), सनी टायरन पिंटो(रा.काळेवाडी पेट्रोल पंपाच्या मागे, पुणे) या 5 गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. देवगन, गणेश, अक्षय हे तीनही आरोपी दौंड पोलिसांनी मोक्याच्या पुण्यात अटक केलेले आहेत. अजिंक्य याच्यांवर लोणीकाळभोर तर सनी याच्यावर वाकड पोलिस स्टेशन येथे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास येरवडा येथील जात पडताळणी कार्यालयाच्या आवारातील तात्पुरत्या कारागृहाच्या इमारत क्रमांक चारच्या पहिल्या मजल्यावरील खोली क्रमांक 5 मधील खिड़कीचे दोन गज उचकटून टाकून 5 आरोपी पळून गेल्याचा प्रकार बंदोबस्तावरील पोलिसांच्या लक्षात आला. याची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

येरवडा तात्पुरत्या कारागृहात सध्या एकूण 568 न्यायाधीनबंदी ठेवण्यात आलेले आहेत. बंदी पळून जाण्याच्या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे सध्या पुणे पोलीस आयुक्तालय मधील दोन अधिकारी, बारा कर्मचारी, कारागृह विभागाचा एक अधिकारी व 18 कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. मात्र तरीदेखील बंदी पळून जाण्याच्या घटनांचे सत्र सुरूच आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू आहे.



AM News Developed by Kalavati Technologies