पूरग्रस्त भागात 325 वैद्यकीय पथके कार्यरत

साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे आरोग्य विभागामार्फत आवाहन

मुंबई । राज्यातील पूरग्रस्त भागातील नागरिकांना आरोग्य सेवा देण्यासाठी विभागामार्फत वैद्यकीय पथकांची संख्या वाढविण्यात आली असून सुमारे 325 वैद्यकीय पथके ठिकठिकाणी कार्यरत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. पूर परिस्थितीनंतर त्या भागात उद्‌भवणाऱ्या साथीच्या आजारांवर मात करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आवाहन करण्यात येत आहे. विभागामार्फत पूरग्रस्त भागात वैद्यकीय पथक पाठविण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी असून मोठ्या लोकसंख्येच्या गावात पथकामध्ये दोन महिला कर्मचारी व दोन पुरुष कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. छोट्या गावांसाठी पथकामध्ये एक महिला व एक पुरुष कर्मचारी ठेवण्यात आला आहे.

औषधोपचाराबरोबरच नागरिकांना निर्जंतुकीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा होण्याकरिता ब्लीचिंग पावडर, क्लोरीन टॅब्लेट्‌स, लिक्विड क्लोरीनचा वापर करण्याबाबत संबंधित यंत्रणेला सूचना द्याव्यात. शहरी व ग्रामीण भागातील घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे विस्थापित झालेल्या लोकांसाठी शाळा, मंगल कार्यालये, मंदिर आदी ठिकाणी वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणी दररोज करावी. गावात सार्वजनिक स्वच्छता करणे, तुंबलेली गटारे साफ करणे, केर कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी बाबी ग्राम पंचायतीच्या सहकार्याने करुन घ्यावी, अशी सूचना आरोग्य विभागाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

पाणी ओसरलेल्या गावात जंतूनाशकाची धुरळणी करावी. जेणेकरुन डास व इतर कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार नाही. पूर परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करणे काही गावात शक्य नसल्यास जिल्हाधिकाऱ्यांच्या सहकार्याने टँकरच्या सहाय्याने निर्जंतुकीकरण केलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा.

घरोघरी सर्वेक्षण करुन जलजन्य आजार अतिसार, गॅस्ट्रो, कावीळ, विषमज्वर तापाचे रुग्ण याबाबतचे सर्वेक्षण करावे. चोवीस तास नियंत्रण कक्ष कार्यरत राहिल याची दक्षता घेतानाच सर्व ठिकाणी औषधांचा साठा उपलब्ध राहील याबाबत नियोजन करावे. ब्लीचिंग पावडर, क्लोरीन टॅब्लेट्‌स, लिक्विड क्लोरीन व अत्यावश्यक औषधांची खरेदी जिल्हा परिषदेच्या निधीतून करण्यात यावी.

पुराच्या पाण्यातून चालत गेलेल्या नागरिकांना ताप आल्यास त्यांनी तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे किंवा गावात कार्यरत असलेल्या वैद्यकीय पथकाकडून आवश्यक उपचार करुन घ्यावेत.दोन महिन्याच्या आतील बालकांना अतिसाराची लागण झाल्यास तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे. अशा सूचना देखील आरोग्य विभागाने दिल्या आहेत.

पूरग्रस्त भागात जास्तीच्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासल्यास पूर परिस्थिती नसलेल्या विभागातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची तात्पुरती नियुक्ती करण्यात येईल, असेही आरोग्य विभागामार्फत कळविण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies