माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडल्याने; तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला

माजलगाव धरणाचे 11 दरवाजे उघडण्यात आले असून, 42 हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे.

माजलगाव । माजलगाव तालुक्यातील सिंदफणा आणि गोदावरी नदीला आलेल्या पूराने तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. माजलगाव धरणातून सकाळी विसर्ग वाढविण्यात आला असून आज 11 दरवाजे उघडल्यामुळे सिंधफना आणि गोदावरी नद्यांना पूर आला आहे. सध्या होत असलेल्या पावसाने पैठण पाठोपाठ माजलगावच्या धरणाचेही दरवाजे उघडले आहेत. यामुळे नदीपात्रा शेजारील गावांना मोठ्या पुराचा सामना करावा लागणार असून, सतर्क राहण्याचा इशारा देखील प्रशासनाने दिला आहे. शिवाय या नद्यांना पूर आल्याने माजलगाव तालुक्यातील संडस चिंचोली या गावाचा संपर्क पुर्णपणे तुटला आहे. तर सर्व गाव पाण्याखाली गेल्याची माहिती मिळत आहे. शिवाय ढेपगावच्या दळणवळणाचा संपर्क देखील तुटला आहे. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

माजलगाव सध्या 42 हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जायकवाडी प्रकल्पातून आज सकाळपासून 1 लाख क्यूसेक वेगाने गोदावरीत विसर्ग सुरु आहे. त्यामुळे मंजरथ आणि त्यापुढील गावात सुमारे दिड लाख क्यूसेकपेक्षाही जास्त वेगाने पाणी दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गोदावरी नदी यापुर्वीच दुथडी भरून वाहत होती. त्यात आता सिंदफणा नदीचे पाणी मिसळले आहे. गोदावरीचा पाण्याचा वेग वाढणार असल्याने सिंदफणा नदीकाठच्या गावांना पाण्याचा मोठा तुंब येऊ शकतो. त्यामुळे नागडगाव, रोषनपुरी, शिंपेटाकळी, मनुर या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. माजलगाव धरणाचे एकूण 11 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पातून गोदापात्रात एक लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग आज सकाळपासून सुरु असल्याने हे पाणी येत्या 12 तासात गेवराई तालुक्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सावळेश्वर, कटचिंचोली, मिरगाव, पांगुळगाव, राहेरी, भोगलगाव, गंगावाडी, राजापूर, काठोडा, मनुबाई जवळा आदी गावांना महापूराचा सामना करावा लागू शकतो.AM News Developed by Kalavati Technologies