उत्तर प्रदेशात सामूहिक बलात्कार, पीडितेला जिवंत जाळलं, 90 टक्के जळाली तरुणी

या पीडित मुलीवर मार्च 2019 मध्ये बलात्कार करण्यात आला होता.

नवी दिल्ली | हैदराबाद येथील बलात्काराची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशातील उन्नावमधूनही तशीच घटना समोर आली आहे. सामूहिक बलात्कार पीडितेला मारहाण करत जिवंत जाळण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. महिलेने ज्या सहा जणांवर बलात्काराचा आरोप केला आहे. त्या लोकांनीच महिलेवर हल्ला करत हे कृत्य केलं आहे.

पीडित महिला ट्रेन पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनला जात होती. यावेळी रस्त्यात आरोपींनी तिला थांबवलं आणि मारहाण केली आणि भोसकलं. तसेच तिला जिवंत जाळण्यात आलं आहे. तिला जाळून या आरोपींनी तिथून पळ काढला. महिलेला उन्नाव येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. नंतर कानपूर येथील एलएलआर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. ही तरुणी 90 टक्के जळाली आहे. तिची तब्येत गंभीर आहे.

या पीडित मुलीवर मार्च 2019 मध्ये बलात्कार करण्यात आला होता. तिने याविषयी तक्रार दाखल केली होती. पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले होते. आता याच पाच जणांनी तिला मारहाण करत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. या पाचमधील 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दोन आरोपींचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना जबाब दिला आहे. तिने सांगितलं की, एकूण सहा जणांनी मिळून हल्ला केला. यावेळी तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला चाकूने भोसकण्यातही आले होते. पीडित तरुणी जमिनीवर पडली असता तिच्यावर केरोसिन टाकून जाळण्यात आलं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवले यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.AM News Developed by Kalavati Technologies