परभणी | गंगाखेडमध्ये दोन डॉक्टरांसह एक परिचारिका कोरोना पॉझिटिव्ह

गंगाखेडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे.

परभणी | जिल्ह्यात कोरोनाचे थैमान सुरूच आहे. आज उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड येथील दोन डॉक्टरांसह एका परिचारिकेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सगळीकडे खळबळ उडाली आहे. त्यामुळं गंगाखेडमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18 वर गेली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गंगाखेड तालुकावासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही दिवसांपुर्वी मुंबईतील मानखुर्द परिसरातील 24 नागरिक टेम्पोने गंगाखेड तालुक्यातील नागठाणा, माखणी, राणीसावरगाव व गंगाखेड शहरात दाखल झाले आहे. दिनांक 18 मे रोजी परतलेल्या नागठाणा येथील एका महिलेला चक्कर आली असता गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या महिलेचा दिनांक 20 मे रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह निघाला व तालुक्यात एकच खळबळ उडाली.

दरम्यान गंगाखेडचे पोलीस निरीक्षक वाय. एन. शेख व व नगर परिषदेचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण आढळला असल्याचा ठपका ठेवून तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी दिनांक 21 मे रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. या महिलेसह एकाच टेम्पोने आलेल्यांचे स्वॅब घेण्यात आले असता दिनांक चोवीस मे रोजी माखणी येथील सात जणांचे व नागठाणा येथील त्या महिलेच्या संपर्कातील चार जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सदरील रुग्णांवर उपचार करणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयातील दोन डॉक्टरांसस एका परिचारिकेचा दिनांक 26 मे रोजी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने गंगाखेड तालुक्यात कोरोनाविषयी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या आदेशानुसार दिनांक 26 मे ते 28 मे सलग तीन दिवस कर्फ्यु लावण्यात आला आहे. मेडिकल वगळता इतर कडेकोट गंगाखेड शहर बंद ठेवण्यात आले आहे. तसेच शहरातील यज्ञभूमी परिसर, सिद्धार्थ नगर परिसर व जिल्हा मध्यवर्ती बँक शहर शाखा परिसर सील करण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies