महाराष्ट्रात आज कोरोनाचे तब्बल 5 हजार 493 रुग्ण, दिवसभरात 156 मृत्यू

आतापर्यंत महाराष्ट्रात 7 हजार 429 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे.

मुंबई | देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने मोठं थैमान घातलं आहे. गेल्या 24 तासात राज्यात तब्बल 5 हजार 493 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळं राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 64 हजार 626 इतकी झाली आहे. चिंतेत टाकणारी बाब म्हणजे सलग तीन दिवस महाराष्ट्रात 5 हजाराहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तसेच आजच्या दिवशी 156 जणांचा मृत्यू झाल्यानं कोरोनामुळं मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 7 हजार 429 झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 2 हजार 330 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे.

आज झालेले मृत्यू हे मागील 48 तासांमधील आहेत आणि 96 हे त्यापुर्वीच्या कालावधीतील असल्याची माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. या मृत झालेल्या 156 रुग्णांमध्ये मुंबई 64, ठाणे 24, जळगाव 6, जालना आणि अमरावती प्रत्येकी 1 - 1 जणांचा समावेश आहे. तर 96 मृत्यू हे दैनंदिन स्वरुपात न दाखवता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आले आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 9,23,502 नमुन्यांपैकी 1,64,626 (17.82 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहे. सध्या राज्यात 5,70,475 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 37,350 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहे.

आतापर्यंत राज्यातील 86,575 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. यामुळे राज्यातील कोरोनापासून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 52.59 टक्के इतके आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 4.91 टक्के इतका आहे. सद्यस्थितीला राज्यात 70 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.AM News Developed by Kalavati Technologies