#Flashback2019 । यथेच्छ टिका झाल्यानंतर ICC ने बदलला 'तो' नियम, ज्याची झाली जगभर चर्चा

इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती

स्पेशल डेस्क । 2019 हे वर्ष आता संपत आले आहे. लवकरच आपण या वर्षाला निरोप देऊन 2020 या नव्या वर्षाचे स्वागत करणार आहोत. 2019 हे वर्ष अनेक अर्थांनी महत्वपूर्ण ठरले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका, क्रिकेट विश्वचषक, आयपीयल आणि अन्य काही रंजक घटनाघडामोडींनी या वर्षांची रंगत वाढवली. या वर्षभरात घडलेल्या काही महत्वाच्या घटनांचा आढावा आपण #Flashback2019 या सदरातून घेणार आहोत.

या वर्षी झालेल्या आयसीसी विश्वचषकाचा अंतिम सामना अतिशय रंजक झाला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात सुपरओव्हरचा थरार देखील प्रेक्षकांनी अनुभवायला मिळाला. मात्र, आयसीसीच्या एका नियमाने क्रिकेटशौकीनांचा मात्र हिरमोड झाला. त्या नियमाची जगभर चर्चाही झाली. आयसीसीच्या या नियमावर येथेच्छ टिकाही झाली. आयसीसीने या नियमामध्ये आता बदल केला आहे.

2019 साली इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडने न्यूझीलंडवर मात करत विजेतेपद पटकावलं. मात्र मर्यादीत षटकं आणि सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिल्यामुळे इंग्लंडला अधिक चौकारांच्या निकषावर विजेता जाहीर करण्यात आलं. आयसीसीच्या या निर्णयावर नंतर टीकाही करण्यात आली होती. अखेरीस आयसीसीने तो वादग्रस्त निर्णय रद्द केलेला आहे. सोमवारी आयसीसीने यासंदर्भात पत्रक जाहीर करत माहिती दिली आहे.

आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सामना अनिर्णित राहिल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावण्यात येण्याचा निर्णय कायम असणार आहे. मात्र साखळी फेरीत जर सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर तो अधिकृतरित्या अनिर्णित घोषित केला जाईल. मात्र उपांत्य किंवा अंतिम फेरीत सुपर ओव्हरवर सामना अनिर्णित राहिला तर पुन्हा एकदा सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आयसीसीने आपली बाजू स्पष्ट केली आहे.AM News Developed by Kalavati Technologies