लखनऊ | कनिका कपूरच्या अडचणी वाढल्या, लखनऊमध्ये गुन्हा दाखल

कनिकाच्या तपासणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

लखनऊ | बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिच्या विरोधात लखनऊमधील सरोजिनी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगभर करोना विषाणूचा संसर्ग पसरला आहे. दरम्यान लंडनहून आलेली असूनही कनिकाने पार्टीचे आयोजन केले. तिने ती विदेशातून आलेली असतानाही संवेनशील विषयाची माहिती लपवली आणि बेजबाबदारपणा दाखवला असा आरोप तिच्यावर केला जात आहे. या पार्टीमध्ये राजकीय नेते आणि मोठे अधिकारी सहभागी झाले होते. यामुळे आता तिच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.

कनिकाच्या तपासणीत तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्टीत सहभागी झालेले भाजप खासदार यानंतर संसदेमध्येही गेले होते. यासोबतच त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि इतर अनेक नेत्यांचीही भेट घेतली होती. याची देशभर जोरदार चर्चा झाली. यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उच्चस्थरीय बैठक बोलावली. या बैठकीत कनिका कपूर विरोधात एफआयर नोंदवण्याचे आदेश मुख्यमंत्री आदित्यनाथांनी दिले. त्यानंतर संवेदनशील विषयाबाबतची वस्तुस्थिती लपवल्याबद्दल आणि नागरिकांच्या आयुष्याला धोका निर्माण केल्याबद्दल कनिकाविरोधात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तिच्याविरोधात भादवि कलम 188, 269 आणि 270 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.AM News Developed by Kalavati Technologies