राहुल गांधींच्या विरोधात भाजपचे धरणे आंदोलन

न्यायालयाने राहुल गांधींचा माफीनामा स्वीकारला असला तरीही राहुल गांधींनी आता जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.

नवी दिल्ली | चौकीदार चोर है नारा देत लोकसभा निवडणुकीत देशाच्या पंतप्रधानांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी गांधी चौकात भाजपा नेते रस्त्यावर उतरले. मागील पाच वर्षाच्या कार्यकाळात केंद्र सरकारने देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने राफेल विमानाची खरेदी केली. मात्र खरेदी व्यवहारावर आक्षेप घेत खासदार राहुल गांधी यांनी थेट चौकीदार चोर है असाच आरोप लोकसभा निवडणुकीत केला. सर्वोच्च न्यायालयात चौकशी करण्यासंदर्भात याचिका दाखल केली. परंतू आता सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला क्लिन चिट दिल्याने राहुल गांधी यांच्या बेजवाबदार वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाने राहुल गांधींचा माफीनामा स्वीकारला असला तरीही राहुल गांधींनी आता जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली.

कॉंग्रेसचे नेता राहुल गांधी यांच्याविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. याच पार्श्‍वभूमीवर राहुल गांधींच्या विरोधात भाजपकडून देशव्यापी आंदोलन केले जात आहे. राफेल मुद्द्यावर राहुल गांधी खोटे बोलत असून त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी करत भाजपकडून देशभरामध्ये आंदोलन सुरू आहेत. मुंबईमध्ये देखील भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत. दादर येथील भाजपच्या कार्यालयाबाहेरही भाजपकडून आंदोलन सुरु आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन केले गेले.

राफेल मुद्द्यावर राहुल गांधीसह कॉंग्रेसने संपूर्ण देशाची माफी मागायला हवी. अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. राहुल गांधींना ‘जनाची नाही तर मनाची असेल’ तर त्यांनी माफी मागावी असेही ते म्हणाले. भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. राहुल गांधींविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरु आहे.AM News Developed by Kalavati Technologies