चहाचा महीना । एक गरम चाय हो जाय...

चहा पिण्याचे आरोग्यदायी फायदे..!

आरोग्य डेस्क । अपेयपान ते अमृततुल्य असा प्रवास करणाऱ्या तुमच्या आमच्या सर्वांच्या जीवनातील अविभाज्य भाग बनलेल्या चहाचा आज जागतिक दिन आहे. जगातील कोट्यवधी नागरिकांच्या दिवसाची सुरूवातच गरमा गरम चहाने होते. गरीब असो वा श्रीमंत प्रत्येकाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान मिळवणाऱ्या या चहाची महिमा अपरंपारच म्हणावी लागेल. एक कप चहामुळं मैत्री होते, नाती जुळतात, नात्यांचे बंध घट्ट होतात, गप्पांचे फड रंगतात, कधी मौन सुटतं, तर कधी मनोमीलन होतं. कधी कधी अडचणीतील कामंही एक कप चहामुळं पूर्ण होतात. अशा प्रकारे अनेक समस्यांवरील समाधान बनलेला चहा आरोग्याची समस्या होऊ शकतो असं कितीही सांगितलं तरी त्यावरील प्रेम मात्र कमी होत नाही.

चहामध्ये तणाव दूर करण्याचे घटक असतात. चहामुळे थकवा, आळस दूर निघून जातो, असे एका संशोधनातून समोर आल्याचे सांगण्यात येते. दूधाच्या चहा इतकाच कोरा चहा, पुदीना, लेमन टी, आल्याचा चहा असे वेगवेगळ्या प्रकारचे चहा शरीरासाठी बदलत्या हवामानानुसार फायदेशीर असतात. चहामधील तुळस आणि आलं सर्दी खोकल्याच्या आजारापासून दूर ठेवते. दरम्यान, आरोग्यासाठी चहा फादेशीर असला तरी अति सेवन न करता रोज घ्यायला काही हरकत नसल्याचेही बऱ्याचदा संशोधनातून म्हटले जाते.

ब्रिटीशांनी भारतभर प्रसार केलेल्या या चहाच्या व्यापारातून अनेक जण कोट्यधीश झाले, तर अनेकांना रोजगाराचं साधन यामुळं मिळालं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कधी काळी चहा विकल्याचं सांगितलं जातं. असा हा चहाचा महिमा. वर्णावा तेवढा कमी. कमीत कमी 5 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत मिळणाऱ्या चहाचे सध्या अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. ग्रीन टी, ब्लॅक टी, लेमन टी, गोल्डन टी यासह अनेक प्रकारचा चहा सध्या बाजारात पिण्यासाठी मिळतो. सर्वात आधी चहा चीनमध्ये बनवण्यात आल्याचं इतिहासात सांगितलं जातं. भारतात 1835 पासून चहा पिण्याची सुरूवात झाल्याची माहिती आहे. सुरूवातीला भारतात गुळाचा चहा केला जायचा.. त्यानंतर साखरेनं चहात शिरकाव केला. हल्ली अनेक ठिकाणी वापरल्या जाणाऱ्या टी बॅगचा शोध चुकून लागलाय. अमेरिकेतील व्यापारी थॉमस सुलिवनने चहाचं सँपल एका सिल्क बॅगमध्ये टाकून ग्राहकाला दिले. त्यावेळी ग्राहकानं पूर्ण सिल्क बॅगच गरम पाण्यात टाकली. जेव्हा सुलिवनला आपल्या या चुकीचाही फायदा मिळायला लागला तेव्हा त्याने टी बॅग बनवून विकायला सुरुवात केली. असा हा चहाचा इतिहास. चहा आरोग्यासाठी अपायकारक असल्याचं सांगितलं जात असलं तरी ऑस्टेलियामध्ये झालेल्या एका संशोधनानुसार चहा प्यायल्यानं हाडं मजबूत होत असल्याचं समोर आलंय. चहाच्या अपायांविषयी कितीही सांगितलं तरी एक कप चहा पिल्यानं तरतरी येते हे वैश्विक सत्य कुणीही नाकारत नाही. अशाच तरतरीसाठी चहाचा घोट रिचवून त्याच्या चवीचा आनंद घेणाऱ्या जगभरातील तमाम चहा प्रेमींना जागतिक चहा दिनाच्या मनमुराद शुभेच्छा.AM News Developed by Kalavati Technologies