पोहणे पडले महागात; धरणात पोहण्यासाठी गेलेल्या 2 युवकांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण आणि अरुणावती धरणात पोहणे शिकण्यासाठी गेलेल्या 2 तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू

यवतमाळ । यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातील नांदगव्हाण धरण येथे पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाची तर अरूणावती धरणातील बकेट क्षेत्रांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या घटनांमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. यंदा दमदार पावसाच्या हजेरीमुळे दिग्रस शहरापासून जवळच असलेले नांदगव्हाण धरण पाण्याने तुडूंब भरल्याने, नांदगव्हाण धरणाला पर्यटन स्थळाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तर अरुणावती प्रकल्प 99 टक्के भरल्याने अरुणावती धरणाचे 3 गेट उघडण्यात आले होते. त्यामुळे तेथे बघ्यांची गर्दी होत आहे.

अशातच दिग्रस येथील पाच युवक नांदगव्हाण धरणाकडे गेले असता, पोहणे येत नसतांना देखील पाच युवकांनी धरणात पोहण्याचा प्रयत्न केला. पोहतांना पाण्याच्या खोलीचा अंदाज न लागल्याने मनीष राठोड (वय 18) राहणार दिग्रस हा युवक बुडाला असून त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्यात आला.

अरुणावती धरणाकडे घडलेल्या दुसऱ्या घटनेत अरुणावती धरणाच्या गेट समोरील बकेट क्षेत्रात सायंकाळच्या सुमारास पोहण्याच्या उद्देशाने उडी मारताच चिरकुटा या गावातील युवक दिनेश भेंडे (वय 22) हा युवक बुडाला. उडी मारल्याने नाका-तोंडात पाणी जाऊन त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. सदर युवकाचा बराच वेळ शोध घेणे सुरू होते. बुडालेल्या युवकाचा मृतदेह दुसऱ्या दिवशी सकाळी सापडला आहे. तालुक्यातील दोन्ही धरणात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.AM News Developed by Kalavati Technologies