विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट म्हणुन दिले बेशरमाचे झाड, त्रस्त नागरिकांनी उचलले पाऊल

काही वर्षापूर्वी या विभागाच्या गलथान कारभाराला कंटाळून नागरिकांनी उठाव करून कार्यालय पेटवून दिले होते

यवतमाळ । मागील अनेक दिवसापासून विद्युत विभागाच्या कारभारामध्ये आणि विद्युत पुरवठ्यामध्ये अनियमितता निर्माण झाली आहे. याला त्रस्त होऊन अखेर दिग्रसच्या सर्वपक्षीय सदस्यांनी धिक्कार मोर्चा काढून कार्यालय गाठले आणि अधिकाऱ्यांना बेशरमाचे झाड भेट स्वरूपात दिले.

दिग्रस विद्युत विभाग कार्यालय नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. काही वर्षापूर्वी या विभागाच्या गलथान कारभाराला कंटाळून नागरिकांनी उठाव करून कार्यालय पेटवून दिले होते. त्यानंतर काही दिवस पर्यंत या विभागाचे कामकाज व्यवस्थित चालले. त्यानंतर मात्र परत विद्युत पुरवठा मध्ये अनियमितता निर्माण झाली. या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले. मागील चार महिन्यापासून ही समस्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढली होती. त्यात दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला संपूर्ण शहराचा विद्युत पुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट निर्माण झाली. अखेर काही दिवसा नंतर सर्वपक्षीय सदस्यांनी मिळून विद्युत विभागाच्या भोंगळ कारभाराचा निषेध केला होता. त्यावेळेस विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी परत अशी समस्या निर्माण होणार नाही असे सांगून वेळ मारून नेली होती. परंतु वारंवार लाईन जाण्याचा प्रकार वाढतच राहिला. त्यातही काल संपूर्ण रात्रभर लाईन नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. याची प्रतिक्रिया म्हणून आज शहरातील सर्वपक्षीय सदस्यांनी विद्युत विभाग कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या खुर्च्यांना बेशरमाचे झाड फुल आणि हार वाहून निषेध व्यक्त केला. या वेळेस संबंधित अधिकाऱ्याने यापुढे अशी कोणतीही समस्या निर्माण होणार नाही असे आश्वासन दिले. तर जमलेल्या प्रतिनिधींनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिलेला आहे.AM News Developed by Kalavati Technologies