कोणी कितीही ऑफर दिल्या तरी गळाला लागणार नाही - चंद्रशेखर बावनकुळे

विदर्भातील भाजपचे एक मोठे नेते संपर्कात शिवसेना असून त्या मोठ्या नेत्याला मोठ्या पदाची ऑफर दिल्याची चर्चा होती

नागपूर । मी भारतीय जनता पक्षाचा 1992 पासूनचा सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला कोणी कितीही ऑफर दिल्या किंवा कोणी कितीही गळाला लावण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नसल्याचं नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

पंतप्रधान मोदी, पक्षाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री गडकरी व मुख्यमंत्री फडणवीस यांनी आतापर्यंत पक्षात भरपूर मानसन्मान दिला आहे. त्यामुळे मी कुठेही जाणार नाही, शिवाय कुणाकडूनही काही ऑफर नसल्याचं बावनकुळे यांनी यावेळी स्पष्ट केलं. विदर्भातील भाजपचे एक मोठे नेते संपर्कात शिवसेना असून त्या मोठ्या नेत्याला मोठ्या पदाची ऑफर दिल्याची चर्चा होती. भाजपचे हे मोठे नेते बावनकुळे असल्याची चर्चा होती. यावर बावनकुळे यांनी स्पष्टोक्ती दिली. तसेच भाजपच्या कोर कमिटीचे नेते सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत व आतापर्यंत राज्याचा यशस्वीपणे कारभार सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार आहेत. फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार हे पंतप्रधान मोदी व पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणूक काळातच जाहीर केले होते. त्यामुळे युतीच्या नैसर्गिक न्यायाप्रमाणे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असे बावनकुळे यावेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी बावनकुळे यांचं नाव आघाडीवर असल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की 1992 पासून पक्षाने जी जबाबदारी दिली ती पूर्ण केली आहे व यापुढेही पक्ष जी जबाबदारी देईल ती संपूर्णपणे पार पाडणार.



AM News Developed by Kalavati Technologies