राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत, भाजपला जोरदार टोला

अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले.

अमरावती | राज्यात दूधाला 10 रुपये अनुदान जाहीर करावे यासाठी भाजपकडून तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. राज्यात ठिकठिकाणाहून या आंदोलनाला शेतकऱ्यांनी पाठींबा दर्शविला आहे. दुध रस्त्यावर ओतून तर कुठे दुधाने अभिषेक करून सरकारचा तीव्र निषेध केला जात आहे. दरम्यान, अमरावती येथे राज्यमंत्री बच्चू कडू दूध आंदोलकांच्या सोबत असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी त्यांनी या आंदोलनावरुन भाजपला चिमटा काढलाआहे. ज्या ज्या राज्यात भाजपची सत्ता आहे तेथे दुधाला किती भाव देण्यात येतो हे लक्षात घ्या. केवळ राजकारण करु नये, असा सल्लाही भाजपला दिला.

आज भाजपच्यावतीने दूध दरवाढीसाठी राज्यभरात आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नुसते आंदोलन न करता केंद्राकडूनही निधी आणून दूध उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अशी मागणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. राज्य सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. यावेळी मंत्री बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल चढवला. भाजपने आंदोलन करतांना केंद्रातून निधी कसा आणता येईल याकडेही लक्ष दिले पाहिजे. या देशात केंद्र सरकारात आपण आहात. केंद्राने फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये. भाजपची जिथे जिथे सत्ता आहे तिथे आपण दुधाला किती भाव देतो हेही तपासले पाहिजे, फक्त राजकारण करायचं म्हणून आंदोलन करु नये, असे बच्चू कडू म्हणाले.



AM News Developed by Kalavati Technologies