अकोल्यात लाखमोलाचे बाप्पा चर्चेचा विषय, 21 लाखांच्या चलनी नोटांचा उपयोग करून साकारली बाप्पांची मूर्ती

मूर्ती तयार करताना नोटा खराब होणार नाही, याची काळजी घेण्यात आली

अकोला । गवळीपुरा- मनकर्णा प्लॅाट भागातील विर भगतसिंग मंडळाने यंदा 21 लाख 10 हजार 300 रुपयांच्या चलनी नोटांचा उपयोग करून बाप्पांची मूर्ती साकारली आहे. 12 फूट उंच, 8 फूट रुंद ही गणरायाची मूर्ती अकोल्यात चर्चेचा विषय ठरली. गणेशमूर्ती संरक्षणासाठी पोलिसांचा 24 तास कडक पहारा येथे तैनात आहे. दिव्यांग कलाकार राजेश ऊर्फ टिल्लू टावरी यांनी 15 दिवसांत या मूर्तीला आकार दिला.

ही मूर्ती घडवण्यासाठी त्यांनी वर्षभर हजारो रुपयांची बचत केली. तसेच इतर रक्कम वर्गणीद्वारे व मित्रांकडून गोळा केली. मूर्ती तयार करताना नोटा खराब होणार नाही, याची काळजी घेण्यात आलीये. त्यासाठी यू पीनद्वारे कॅनव्हासवर नोटा जोडून गणपतीची मूर्ती तयार करण्यात आली. संपूर्णता पर्यावरण पूरक मूर्ती आहे, असा मंडळाचा दावा आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी 16 लाख रूपयांच्या नोटांद्वारे गणपती मूर्ती तयार करून हे मंडळ संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरले होते. या वर्षी मंडळाच्या सुवर्ण जयंती वर्षानिमित्त 21 लाखांच्या नोटांचा उपयोग करुन मूर्ती तयार करण्यात आली आहे. बाप्पांची चलनी नोटांनी तयार करण्यात आलेल्या गणरायाची सोंड आणि शरिराचे इतर भाग हलक्या पोपटी रंगाच्या 500 च्या नोटांद्वारे तयार करण्यात आले. सोनेरी रंगाच्या 200 च्या नोटांचा मुकूट, तर 50 आणि 100 च्या अनुक्रमे निळ्या व जांभळ्या नोटांचा वापर पितांबर आणि दुपट्टा तयार करण्यासाठी करण्यात आला.AM News Developed by Kalavati Technologies