गडचिरोली जिल्ह्यात सोमवारपासून मुसळधार पाऊस, अनेक घरांमध्ये पाणी

कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती काहीशी गडचिरोली शहरात निर्माण झाली आहे.

गडचिरोली | सोमवारी सायंकाळपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात एकट्या गडचिरोली तालुक्‍यात तब्बल 126 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून या पावसाने नगरपरिषद, पेट्रोल पंपसह अनेक रस्ते पाण्याखाली गेली आहेत. तर कन्नमवार वॉर्डांमध्ये रस्त्यांवरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली सारखी परिस्थिती काहीशी गडचिरोली शहरात निर्माण झाली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. 6 ऑगस्टपासून सलग तीन ते चार दिवस पाऊस झाला. त्यानंतर दोन दिवस पावसाने उसंत घेतली. 12 ऑगस्टपासून पुन्हा पावसाने जोर धरला असून गेल्या चोवीस तासात जिल्हाभरात सरासरी 55.1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक 126 मिलिमीटर पाऊस गडचिरोली तालुक्यात झाला. तर धानोरा तालुक्यात 89, आरमोरी 99 तर कुरखेडा तालुक्यात 90 मिलिमीटर पाऊस झाला. या पावसामुळे कुरखेडा तालुक्यातून वाहणाऱ्या सती नदीला पूर आला आहे. सती नदीवर कढोली जवळ असलेल्या पुलावरून तीन फूट पाणी वाहत असल्याने कढोली-वैरागड मार्ग आज सकाळ पासून बंद झाला आहे. आता हे मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात मोठी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.AM News Developed by Kalavati Technologies