गडचिरोली पोलिसांना मोठे यश, सात जहाल नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

या नक्षलवाद्यांवर 33 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं

गडचिरोली  । विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. जिल्ह्यात सक्रिय नक्षलवाद्यांच्या चातगाव दलममधील सात जहाल नक्षलवाद्यांनी आज पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या नक्षलवाद्यांवर 33 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं.

नक्षल चळवळीत काम करताना होणारी पिळवणूक, कमी होत चाललेला जनाधार, उपासमार, यामुळं कंटाळून चातगाव दलमच्या सात जहाल नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केलं. हे सातही नक्षलवादी जिल्ह्यात झालेल्या विविध सशस्त्र कारवायात सहभागी होते. त्यांच्यावर जाळपोळ करणं, हत्या करणं अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील प्रत्येकावर पोलिसांनी लाखो रुपयांची बक्षीसं जाहीर केली होती. मागील काही दिवसांपासून पोलीस विभागानं नक्षलग्रस्त क्षेत्रावर जी पकड निर्माण केली, त्यामुळं नक्षल चळवळीला मरगळ आली होती. लोकांनी मुख्य प्रवाहात येण्याची मानसिकता तयार केल्यानं चळवळीला समर्थन मिळणं कठीण झालं होतं. अशातच या नक्षल्यांना अलीकडे असुरक्षित वाटू लागलं होतं. चळवळीतील सदस्य भयग्रस्त झाले होते. पिळवणूक सुरू झाली होती. उपासमार होत होती. या साऱ्या प्रकाराला कंटाळून आम्ही आत्मसमर्पण करीत असल्याची कबुली आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिली.

आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये एक कमांडर, तीन महिला आणि उपकमांडरचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेलं आत्मसमर्पण हे पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. या वर्षभरात गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळालं असून 23 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे. या आत्मसमर्पणामुळं नक्षल चळवळीला मोठा हादरा बसलाय.

आत्मसमर्पण केलेले नक्षलवादी

1) राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), चातगाव दलम कमांडर, सात खून, 5.50 लाखांचं बक्षीस

2) देविदास उर्फ मनिराम सोनू आचला (२५), 9 खून, 5 लाखांचं बक्षीस, उपकमांडर

3) रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), खून-1, बक्षीस-4.50 लाख

4) अखिला ऊर्फ राधे झुरे (२८), खून 3, बक्षीस 4.50 लाख

5) शिवा विज्या कोटावी (२२), बक्षीस -4.50 लाख

6) करुणा ऊर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२)), खून-1, बक्षीस - 4.50 लाख

7) राहुल ऊर्फ दामजी सोमजी पल्लो (२५), खून 4, बक्षीस- 5 लाखAM News Developed by Kalavati Technologies