नागपूर | वस्तीत बेदरकारपणे गाडी चालवून वस्तीतील नागरिकांना नेहमी त्रास देणाऱ्या गुंडाची जमावाने हत्या केल्याची घटना नागपूरच्या शांतीनगर परिसरात घडली आहे. आशिष देशपांडे असे मृत गुंडाचे नाव आहे. याप्रकरणी पोलसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.
नागपूरच्या शांतीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील नालंदा चौक परिसरात मृत ३२ वर्षीय आशिष देशपांडे राहत होता. आशिष हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद होती. वस्तीतील निमुळत्या गल्लीतूनही जाताना तो अत्यंत वेगाने व बेदरकारपणे दुचाकी चालवायचा. या कारणावरून वस्तीतील नागरिकांशी त्याचा यापूर्वीही वाद झाला होता. सोमवारी रात्री अशाच पद्धतीने त्याने गल्लीतून दुचाकी जोरात नेली. त्यावेळी वस्तीतील महिलांनी त्याला हटकले. ज्यावरून महिलांशी त्याचा वाद झाला. महिलांनी पोलिसांना शंभर नंबरवर फोन करून घटनेची माहिती देताच तो तेथून पळून गेला. रात्री उशिरा पुन्हा आशिष देशपांडे परत आला व त्याने वस्तीतील नागरिकांशी वाद घातला. यावरून उपस्थित असलेल्या नागरिकांसोबत त्याची हाणामारी झाली. हाणामारीत आरोपींनी तीक्ष्ण हत्यार व दगडी फरशीने आशिषवर वार केले ज्यात तो गंभीर जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी आशिषला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींपैकी चार आरोपींवर कुठलाही गुन्हा दाखल नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.