भारतीय महिला संघाचा न्यूझीलंडवर 9 विकेटने दणदणीत विजय

तीन सामन्यांच्या मालिकेत भारताची 1-0 ने आघाडी

नेपियर | भारताच्या पुरुष संघापाठोपाठ महिला संघानेही न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडच्या 192 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मंधानाने खणखणीत शतक झळकावले. तर जेमिमा रोर्डिग्सने नाबाद 81 धावांची खेळी साकारली. 2018 वर्षात आयसीसीच्या सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार जिंकणाऱ्या स्मृतीचे हे कारकिर्दीतील चौथे शतक ठरले आहे. स्मृती आणि जेमिमा या दोघींनी पहिल्या विकेटसाठी विक्रमी 190 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळे त्यांनी 2003 सालचा अंजू जैन आणि जया शर्मा यांच्या 144 धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला. भारताने हा सामना 9 विकेटने जिंकून तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय.

धोनी, विराटप्रमाणे महिला क्रिकेटपटूंचीही धम्माल

भारतीय पुरुष संघाने न्यूझीलंडवर विजय मिळवल्यानतंर विराट कोहलीनं आणि महेंद्रसिंग धोनीनेही ‘सेगवे’चा आनंद लुटला. यात महिला क्रिकेटपटू देखील मागे राहिल्या नाहीत. भारतीय महिला संघानेही न्यूझीलंडला 9 विकेटने पराभूत केले आणि धोनी अन् विराटप्रमाणे सेगवेवरून फेरफटका मारला. व्हाय शुल्ड बॉइज हॅव ऑल द फन? असं म्हणत भारतीय संघातील महिला खेळाडू मानसी जोशीनं ‘सेगवे’ या दुचाकीवरून सफर केली.