IND vs AUS: मयांक अग्रवालची पदार्पणातच दमदार खेळी, दिवसअखेर 2 बाद 215 धावा

स्पोर्ट डेस्क | सलामीवीर मयांक अग्रवाल आणि चेतेश्वर पुजारा यांच्या दमदार अर्धशतकांच्या बळावर भारत मेलबर्न कसोटीत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. पहिल्या दिवसअखेर भारताने दोन बाद 215 धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर मयांक अग्रवालने त्याच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत 76 धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियात पदार्पणातच सलामीवीराने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. या खेळीसह त्याने 71 वर्षांपूर्वीचा दत्तू फडकर यांचा विक्रम मोडला.

हनुमा विहारी मात्र, अवघ्या 8 धावा करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या चेतेश्वर पुजाराने नाबाद 68 धावा आणि कर्णधार विराट कोहलीने नाबाद 47 धावा झळकावत भारताला मजबूत स्थितीत पोहचवलं. तत्पूर्वी कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि हनुमा विहारी आणि मयांक अग्रवाल या नव्या जोडीला सलामीला पाठवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.